राहाता: अहिल्यानगर-शिर्डी-मनमाड या रस्त्याचे काम वेळेत पूर्ण न केलेल्या तिन्ही ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याबरोबरच त्यांची बॅक गॅरंटी जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. या कामासाठी नव्याने निविदा काढण्यात आली असून, हा रस्ता सहा पदरी असणार आहे. हे काम लवकरच पूर्ण होईल, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांनी सांगितले. अहिल्यानगर जिल्ह्यातून जाणाऱ्या सुरत ते चेन्नई हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा हरित महामार्ग देशाच्या दृष्टीने ‘हार्टलाईन’ ठरेल व जिल्हा औद्योगिक विकासात महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरेल. शेतकऱ्यांनो जमिनी विकू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.
३२६ कोटी रुपये खर्चाच्या नांदुर शिंगोटे ते कोल्हार या ४७ किमी. राष्ट्रीय महामार्गाच्या, ७५० कोटी रुपये खर्चाचा अहिल्यानगर- सबलखेड-आष्टी-चिंचपूर ५० किमी. रस्ता, ३९० कोटीचा बेल्हे-अळकुटी- निघोज-शिरुर रस्ता व ११ कोटीच्या श्रीगोंदा शहरातील पुलाच्या कामांचा शुभारंभ गडकरी यांच्या हस्ते आज, —–शुक्रवारी लोणी येथे करण्यात आला. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार राजाभाऊ वाजे, माजीमंत्री आण्णासाहेब म्हस्के, डॉ. सुजय विखे, आ. मोनिका राजळे, आ. काशिनाथ दाते, आ. विठ्ठलराव लंघे, आ. विक्रमसिंह पाचपुते, आ. अमोल खताळ, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे, मुख्य अभियंता संतोष शेलार, प्रशांत फेगडे, अधीक्षक अभियंता दयानंद विभुते आदी उपस्थित होते.
जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामाची लांबी २०२ किमी. होती. विद्यमान शासनाच्या काळात रस्ते विकासाची ८७० किमी. कामे केल्याने ही लांबी आता १ हजार ७१ किमी. झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार २०८ कोटींची रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले. धुळे-अहिल्यानगर हा ‘बीओटी’ तत्त्वावरील रस्त्याचा ‘डीपीआर’ करण्यात येत असून, उपलब्ध जागेनुसार हा मार्ग सहा पदरी करण्याचा प्रयत्न आहे. अहिल्यानगर-करमाळा-टेंभुर्णी- सोलापूर या ८० किमी. रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी १ हजार १०० कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती त्यांनी दिली




