अहिल्यानगर : दि. १७ मे
महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा हा जनतेच्या हक्कांना जपणारा कायदा असून या कायद्यांतर्गत जनतेला विहित वेळेत सेवा देण्याचे निर्देश राज्य सेवा हक्क आयोगाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी दिले.
तहसिल कार्यालय नेवासा येथील सभागृहात तालुकास्तरीय प्रमुख अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत श्रीमती कुलकर्णी बोलत होत्या. यावेळी आयोगाचे उपसचिव सुनिल जोशी, सहायक कक्ष अधिकारी प्रशांत घोडके, तहसिलदार संजय बिरादार, गटविकास अधिकारी संजय लखवाल, तालुका कृषी अधिकारी धनंजय हिरवे, उपअधीक्षक भूमीअभिलेख संदीप गोसावी,उप विभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, मृदा व जलसंधारण अधिकारी प्रवीण दहातोंडे, महिला व बालविकास अधिकारी भावना पवार आदी उपस्थित होते.
श्रीमती कुलकर्णी म्हणाल्या, महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा हा जनतेच्या हक्कांना जपणारा कायदा आहे. शासकीय कार्यालयातून जनतेला दिल्या जाणाऱ्या सेवांच्या मागणी अर्जामध्ये अधिक वाढ होण्यासाठी अधिकाऱ्यांनी संवेदनशिलपणे सामान्यांनापर्यंत कायद्याची माहिती पोहोचविण्याची गरज आहे. शासकीय सेवेला केवळ उपजिविकेचे साधन न समजता सेवा देणे हे आद्यकर्तव्य असल्याची भावना मनी बाळगून काम करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.
सेवा देताना कारण नसताना विलंब झाल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याची कायद्यात तरतूद असुन अशी कुठलीही वेळ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर येऊ नये याची दक्षता घ्यावी. सेवा देण्यामध्ये काही अडचणी असतील तर आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावा. चांगले काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा आयोगामार्फत गौरव करण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
बैठकीस सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.




