पुणे दि.31 मे.
पुण्यात अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून दिवस-रात्र अभ्यास करणारे हे विद्यार्थी या दुर्दैवी घटनेचे बळी ठरले आहेत. सदाशिव पेठ हा पुण्यातील असा भाग आहे जिथे अनेक अभ्यासिका आहेत आणि शेकडो विद्यार्थी येथे राहून अभ्यास करतात.
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील सदाशिव पेठेत काल शनिवारी सायंकाळी एका मद्यधुंद कारचालकाने अक्षरशः धुमाकूळ घालत १२ जणांना उडवले. या भीषण अपघातात जखमी झालेले सर्वजण MPSC परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असून, त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. ही धक्कादायक घटना भावे हायस्कूलजवळ, श्री साईनाथ अमृततुल्य चहाच्या दुकानाजवळ घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास ही दुर्घटना घडली. अनेक विद्यार्थी दिवसभर अभ्यासिकांमध्ये अभ्यास करून चहा पिण्यासाठी भावे हायस्कूलजवळच्या चहाच्या टपरीवर थांबले होते. याचवेळी जयराम मुले (वय २७, रा. बिबवेवाडी) नावाच्या चालकाने भरधाव वेगात आपली कार (पर्यटक टॅक्सी) चालवत आणली. प्राथमिक अंदाजानुसार, तो मद्यधुंद अवस्थेत होता आणि त्याचा गाडीवरील ताबा सुटला. अनियंत्रित झालेल्या कारने चहाच्या टपरीसमोर उभ्या असलेल्या लोकांवर आणि त्यांच्या पार्क केलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली.
या अपघातात एकूण १२ विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी चालक जयराम मुले याला, तसेच वाहन मालक दिगंबर यादव शिंदे (वय २७) आणि सहप्रवासी राहुल गोसावी (वय २७) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पुण्यात अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून दिवस-रात्र अभ्यास करणारे हे विद्यार्थी या दुर्दैवी..
घटनेचे बळी ठरले आहेत. सदाशिव पेठ हा पुण्यातील असा भाग आहे जिथे अनेक अभ्यासिका आहेत आणि शेकडो विद्यार्थी येथे राहून अभ्यास करतात. उद्या रविवारी या विद्यार्थ्यांची एमपीएससीची परीक्षा होती. मध्यवर्ती आणि गजबजलेल्या भागात ही घटना घडल्याने विद्यार्थी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.




