राहुरी फॅक्टरी /दि. 21 जुन
राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे वीजचोरी करण्यात आली. महावितरणकडून त्याचा दंड आकारण्यात आला. त्याचे बिल न भरणाऱ्या उषा लहारे या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला.
राहुल अहिरे, वय ३० वर्षे, हे राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे राहत असून ते महावितरणमध्ये देवळाली प्रवरा उपविभागात कनिष्ठ अभियंता म्हणुन नोकरी करतात. त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, दि. ३० मे २०२५ रोजी राहुल अहिरे हे राहुरी फॅक्टरी येथील आदिनाथ वसाहत येथे स्मार्ट मीटर चे कामकाज पाहणीसाठी गेले होते.
उषा मदन लहारे यांच्याकडे स्मार्ट मीटर बसवण्याचे काम करण्यात आले होते. तेथे उपस्थित रणजित मदन लहारे यांना त्यांचे अगोदरचे मीटर दाखवण्यास सांगितले, ते मीटर स्मार्ट मीटर शेजारीच होते. सदर मीटरची तपासणी केली असता मीटरचे सील निघालेले होते. तसेच मीटरच्या आतील वायर कट करण्यात आली होती. ही बाब तेथे उपस्थित रणजित मदन लहारे यांच्या निर्दशनात आणुन दिली. त्यामुळे मीटर मध्ये छेडछाड केल्याच्या संशयाने मीटर सील करुन जमा करुन घेतले.
उषा मदन लहारे यांना वीजचोरी बील दिले होते. ते रणजित मदन लहारे ह्यांनी स्विकारले होते. ते बील त्यांनी भरले नाही. त्यामुळे उषा मदन लहारे, रा. आदिनात वसाहत, राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी, या महिलेवर गुन्हा रजि. नं. ६८७/२०२५ भारतीय विद्युत अधिनियम (सुधारणा) २००३ कलम १३५ प्रमाणे विजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या कारवाईमुळे वीजेची चोरी करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.





