मुंबई / सार्वमंथन प्रतिनिधी
मुंबईत मराठा बांधवांच्या आंदोलनाने चांगलाच जोर पकडला असून मुंबई पोलिसांनी अखेर आंदोलनास आणखीन एक दिवसासाठी आंदोलनास परवानगी दिलेली आहे तर गुणरत्न सदावर्ते यांनी जरांगे पाटलांस अटक करण्याची मागणी केली आहे . गुणरत्न सदावर्ते म्हणाले की ,’ कायद्यासमोर जरांगेला मोठं समजू नये. आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जरांगे ऐकला नाही तर चुकीची प्रथा पडेल. नियम मोडले जातील. यामुळे आगामी काळातील आंदोलनांमध्येही नियम मोडण्याची प्रथा पडेल. हे कायद्याचं राज्य आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय म्हणातात यापेक्षा कायदा काय म्हणतो हे पाहून सहा वाजल्यानंतर जरांगेला अटक करून माननीय मॅजिस्टेट यांच्यासमोर उभे करा. कारण कायद्याची पायमल्ली महाराष्टाला परवडणारी नाही ,’
दुसरीकडे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करत असून आज या आंदोलनाचा दुसरा दिवस होता. आज सायंकाळी 6 वाजता या आंदोलनाला असलेली मुदत संपताच आता मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आणखी एका दिवसाची परवानगी दिली आहे त्यामुळे आता आंदोलन उद्याही सुरु राहणार आहे.
कुणबी नोंदी शोधण्यासाठी निवृत्ती न्यायमूर्ती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे समितीची स्थापना करण्यात आली आहे. आज निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. यावेळी शिंदे समितीने मागण्यांची अंमलबजावणीसाठी काही वेळ मागितला. मात्र जरांगे पाटलांनी हैदराबाद आणि सातारा संस्थानचं गॅझेटिअर लागू करण्यासाठी एक मिनिटही वेळ देणार नाही असं विधान केलं आहे.
शिंदे समितीने मनोज जरांगेकडे वेळ मागितला. यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ‘ शनिवार-रविवारच्या आत काही झालं नाही तर एकही मराठ्याचं लेकरूबाळ घरी राहणार नाही. महाराष्ट्रातील मराठा घरात दिसणार नाही. आणखी वेळ गेली नाही. तुमचा अहवाल घ्यावा त्यांनी आणि अंमलबजावणी करावी. मराठवाड्यातील मराठा कुणबी आहे, असं जाहीर करा आणि उद्यापासूनच प्रमाणपत्र द्या.’




