राहुरी विशेष/ प्रतिनिधी
राहुरी शहरात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत उत्सवाच्या आनंदाला डीजेच्या कर्णकर्कश्श आवाजाने गालबोट लागले. मिरवणुकीत वाजवण्यात आलेल्या अत्यंत मोठ्या आवाजाच्या डीजेमुळे अनेक नागरिक त्रस्त झाले. या प्रकारामुळे विशेषतः लहान मुले, वृद्ध नागरिक, तसेच आजारी व्यक्तींना प्रचंड त्रास सहन करावा लागल आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांवरून जात असलेल्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजेचा आवाज इतका तीव्र होता की, अनेकांनी आपली लहान मुले आणि वृद्ध नातेवाईकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने नातेवाईकांच्या घरी पाठवणे पसंत केले. काहींनी कानात कापसाचे बोळे घालून घरातच थांबणे योग्य समजले.
जेष्ठ नागरिकांमध्ये काहींना डोकेदुखी, हृदयाचे ठोके वाढणे अशा समस्या उद्भवल्या, तर लहान मुलांच्या कानांवर आवाजाचा परिणाम झाल्याचे पालकांनी सांगितले. शहरातील डॉक्टरांकडे यासंबंधी कैफियत मांडल्याचे समजते.
शहरातील मुख्य मिरवणूक मार्गावर पोलिस बंदोबस्त असला तरी डीजेच्या आवाजावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असलेलेच पोलिस प्रशासन जर दुर्लक्ष करतील, तर सामान्य नागरिकांनी कुणाकडे दाद मागायची?
पोलिस अधीक्षक यावर काय भुमिका घेतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नागरिकांची मागणी – “आनंद हवा, पण नियमांचं भानही!”
गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि आनंदाचा सण आहे, यामध्ये कोणताही विरोध नाही. मात्र या उत्सवाच्या नावाखाली इतरांना त्रास होईल इतक्या तीव्रतेने डीजे वाजवणे, सार्वजनिक ठिकाणी आरोग्याला धोका निर्माण करणे यावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शहरातील सामाजिक संघटना, नागरिक आणि ज्येष्ठांनी पुढील वर्षीपासून नियमबद्ध, सुसंस्कृत आणि सर्वांनाच सहभागी करून घेणारी मिरवणूक व्हावी यासाठी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली आहे.




