राहूरी तालुक्यातील धानोरे घाटावर शिवतीर्थ मंदिरात! सिंहासनारूढ शिवरायांच्या भव्य मूर्तीचे अनावरण..
सोनगाव /सार्वमंथन
अहिल्यानगर जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या धानोरे घाटावर शिवजयंतीच्या पावन पर्वावर एक सुवर्णक्षण अवतरला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीत, दक्षिण वाहिनी प्रवरा नदीच्या साक्षीने साकारलेल्या ‘शिवतीर्थ’ मंदिरात सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तीमय वातावरणात पार पडले. महंत दत्तगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, या सोहळ्याने संपूर्ण परिसर भगवामय झाला होता.
प्रवरा नदीच्या पवित्र काठावर वसलेले धानोरे गाव धार्मिक आणि ऐतिहासिक वारशाने अत्यंत समृद्ध आहे. येथे प्राचीन धनेश्वर देवस्थान असून, ज्याचा जीर्णोद्धार आणि घाटाची उभारणी खुद्द अहिल्याबाई होळकर यांनी केली होती. या धनेश्वर मंदिरासोबतच या परिसरात श्री दत्त महाराज, हनुमान, विठ्ठल-रुक्मिणी, संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज अशा अनेक देवतांची मंदिरे एकाच परिसरात असल्याने या स्थानाला पूर्वीपासूनच मोठे धार्मिक महत्त्व आहे. याच पवित्र भूमीत आता शिवजयंती निमित्त सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या देखण्या पुतळ्याची प्रतिष्ठापना आणि भव्य ‘शिवतीर्थ’ मंदिराचे लोकार्पण करण्यात आले.
या ऐतिहासिक सोहळ्याची सुरुवात महाराजांच्या मूर्तीला मंगलमयी दुग्धाभिषेक घालून झाली. त्यानंतर ढोल-ताशांच्या कडकडाटात, सनई-चौघड्यांच्या सुरांत आणि “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. मान्यवरांच्या आणि हजारोंच्या संख्येने उपस्थित शिवभक्तांच्या उपस्थितीत भव्य महाआरती करण्यात आली. आकाशात फटाक्यांची आतषबाजी आणि विद्युत रोषणाईने उजळलेल्या वातावरणात उपस्थित जनसमुदायाचा जल्लोष ओसंडून वाहत होता.
यापूर्वी सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिर, श्रीशैलम, कोथरूड, अजिंक्यतारा आणि कोल्हापुरातील कसबा बावडा अशा मोजक्या ठिकाणी महाराजांची मंदिरे उभारण्यात आली आहेत. त्या परंपरेत आता अहिल्यानगर जिल्ह्यातील धानोरे घाट येथील या भव्य ‘शिवतीर्थ’ मंदिराची भर पडली आहे, जे शिवभक्तांसाठी एक मोठे प्रेरणास्थान ठरेल.
या शिवतीर्थ मंदिराच्या उभारणीसाठी, सिंहासनारूढ शिवरायांच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी आणि महाप्रसादासाठी धानोरे व परिसरातील सर्व ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून मोठ्या प्रमाणात योगदान दिले. या ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन श्री क्षेत्र धनेश्वर देवस्थान समिती आणि धानोरे येथील समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते. शिवतीर्थ व्यवस्थापन समिती, विविध युवक मंडळे आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी केला.
देवस्थान समितीच्या वतीने या शिवतीर्थाच्या निर्मितीसाठी किशोर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या स्थापत्य कामाची तसेच मूर्तीकार अलकाताई राऊत यांनी साकारलेल्या देखण्या मूर्तीची प्रशंसा करण्यात आली. कार्यक्रमाचा समारोप उपस्थित भाविकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाने करण्यात आला




