ग्रामीण भागातील दैवतम दूध प्रकल्पाला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची सदिच्छा भेट
दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार..
राहुरी सार्वमंथन :
अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी टाकळीमिया येथील दैवतम मुख्य दूध व दुग्धजन्य पदार्थ प्रकल्पाला सदिच्छा भेट देऊन प्रकल्पाची सविस्तर माहिती जाणून घेतली. ग्रामीण भागात आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचे कामकाज, गुणवत्ता नियंत्रण, स्वच्छता, अन्नसुरक्षा तसेच भविष्यातील विविध उपक्रमांची त्यांनी पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्यासमवेत श्रीरामपूरचे प्रांताधिकारी श्री. तेजस चव्हाण, राहुरीचे तहसीलदार श्री. अमित पवार, तालुका कृषी अधिकारी श्री. शिंदे तसेच जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी श्री. सोनवणे उपस्थित होते.
भेटीदरम्यान दैवतम प्रकल्पातील दुधाच्या विविध तपासण्या, गुणवत्ता नियंत्रणाची प्रक्रिया, FSSAI नियमांचे पालन, क्लिनिंग व हायजिन प्रोटोकॉल, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांची सुरक्षित हाताळणी याबाबत जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी सविस्तर माहिती घेतली.
दैवतमच्या माध्यमातून उत्पादित होणारे दूध व दुग्धजन्य पदार्थ निर्यातीच्या दृष्टीने सक्षम करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचीही त्यांनी माहिती घेतली. दूध व दुग्धजन्य पदार्थांची निर्यात वाढल्यास त्याचा निश्चितच दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला व्यापक बाजारपेठ मिळण्यासाठी अशा आधुनिक प्रक्रिया उद्योगांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.
‘नवप्रभा’ प्रकल्प व ‘दैवत दीदी’ उपक्रमाची दिली माहिती,
दैवतमच्या माध्यमातून सुरू करण्यात येणाऱ्या ‘नवप्रभा’ प्रकल्पाची माहितीही जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी घेतली. या उपक्रमांतर्गत ग्रामीण महिलांसाठी कार्यरत असलेल्या ‘दैवत दीदी’, त्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण तसेच ग्रामीण युवकांसाठी राबविण्यात येणाऱ्या एआय टेक्निशियन प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती त्यांनी जाणून घेतली.
याशिवाय दैवतमच्या माध्यमातून प्रस्तावित असलेल्या बायोगॅस प्रकल्प, इलेक्ट्रिक व्हेईकल उपक्रम तसेच ग्रामीण भागात रोजगार, कौशल्यविकास आणि शाश्वत विकासाला चालना देणाऱ्या विविध योजनांची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली.
ग्रामीण भागातील प्रकल्पाचे केले कौतुक, टाकळीमिया सारख्या ग्रामीण भागात एवढा मोठा आधुनिक दुग्धप्रक्रिया प्रकल्प उभारून तो यशस्वीपणे कार्यान्वित केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दैवतमच्या कार्याचे कौतुक केले.
ग्रामीण भागातील उद्योगांमुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती, शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते, या दृष्टीने दैवतमचा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.
दैवतमच्या माध्यमातून शेतकरी, ग्रामीण महिला व युवकांना केंद्रस्थानी ठेवून दुग्धव्यवसाय, कौशल्यविकास, निर्यात, पर्यावरणपूरक ऊर्जा आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या प्रसंगी दैवतमचे चेअरमन श्री. केशवराव शिंदे, संस्थेचे सर्व संचालक, प्लांट हेड श्री. वाघसाहेब, प्रोक्युरमेंट अधिकारी श्री. खरात तसेच दैवतमचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांच्या या सदिच्छा भेटीमुळे दैवतम परिवारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना निश्चितच प्रेरणा मिळाली असून, शेतकरीहित, गुणवत्ता, अन्नसुरक्षा आणि निर्यातक्षम दुग्धउद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला चालना देण्याचा दैवतमचा संकल्प अधिक बळकट झाला आहे.






