राहुरी विशेष /
राहुरीच्या डॉ.बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना निवडणूकीतून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना रस नसल्याने त्यांनी आपल्या समर्थक उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचे आदेश दिल्याची जोरदार चर्चा तालुक्यात होत असून त्यानुसार कारखान्याचे माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील, दत्तात्रय खुळे, सुधीर तनपुरे, उत्तम आढाव, उत्तम खुळे यासह इतर विखे समर्थक उमेदवार येत्या दोन दिवसांत आपले अर्ज मागे घेणार असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे माजी नगरध्यक्ष सत्यजित कदम यांच्या गटात अद्याप चलबिचल सुरू असून त्यांची भूमिका लवकरच स्पष्ट होणार आहे.
डॉ.तनपुरे कारखाना निवडणुकीसाठी ३१ मे रोजी मतदान प्रकिया पार पडणार आहे. या निवडणुकीत विखे-कर्डिले, सभापती अरुण तनपुरे, युवा नेते राजूभाऊ शेटे व अमृत धुमाळ यांच्या कारखाना बचाव कृती समितीच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहे त. १६ मे अर्ज माघारीचा अखेर दिवस असल्याने निवडणूक रंगणार की बिनविरोध होणार ? हे स्पष्ट होणार आहे.
या निवडणुकीत पालकमंत्री विखे पाटील यांनी अहिल्यानगरला विखे समर्थक उमेदवार व निवडक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आपल्याला या निवडणुकीत रस नसल्याने अर्ज मागे घेण्याच्या सूचना दिल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. त्यानुसार विखे पाटील गटाचे माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील, दत्तात्रय खुळे, सुधीर तनपुरे, उत्तम आढाव, उत्तम खुळेंसह व अन्य विखे समर्थक उमेदवार आपले अर्ज मागे घेऊन नेत्यांचा आदेश पाळणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र दुसरीकडे सर्वांनी एकत्रित येऊन बिनविरोध निवडून करण्याबाबत आवाहन करणारे सत्यजित कदम यांच्या गटातील उमेदवारांनी या निवडणुकीत अर्ज दाखल केले आहे. त्यांनी निवडणुक लढवायची की अर्ज मागे घ्यायचे याबाबत अद्याप निर्णय घेतला नसून तेही आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.
………
निवडणुकीत तनपुरे व डौलेंची भुमिका महत्त्वाची..!
डॉक्टर तनपुरे कारखान्याचे माजी संचालक रावसाहेब चाचा तनपुरे , सुधाकर तनपुरे तसेच विजय डौले यांचीही या निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका असणार आहे.
डौले व तनपुरे हेही काय निर्णय घेतात याकडेही अनेकांची लक्ष लागले आहे.




