पुणे/
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्कीने पाकिस्तानला जाहीर पाठिंबा दिल्याने पुण्यातील व्यापाऱ्यांनी तुर्कीतून आयात होणाऱ्या सफरचंदांवर बहिष्कार टाकला आहे.
या बॉयकॉट तुर्की मोहिमेला व्यापारी आणि ग्राहकांचा मोठा पाठिंबा मिळत असून पुण्याच्या मार्केट यार्डातून तुर्कीचे सफरचंद पूर्णपणे गायब झाले आहेत. यामुळे तुर्कीच्या फळ व्यापाराला सुमारे एकुण एक हजार कोटी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे.
भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर तुर्कीने पाकिस्तानला ड्रोनसह सामरिक पाठिंबा दिला. यामुळे देशभरात तुर्कीविरोधी भावना वाढली आहे. पुण्यातील व्यापारी आणि ग्राहकांनी नेशन फर्स्टची भूमिका घेत तुर्कीच्या सफरचंदांना बाजारातून हद्दपार केले आहे.
बाजारात इराण, वॉशिंग्टन आणि न्यूझीलंडमधून येणाऱ्या सफरचंदाचे दर वाढले आहेत. घाऊक बाजारात १० कि. सफरचंदामागे २०० ते ३०० रुपये तर किरकोळ बाजारात प्रति किलो २० ते ३० रुपये वाढ झाली आहे. तुर्कीच्या सफरचंदांचा हंगाम साधारण तीन महिने चालतो आणि यातून एक हजार ते ते १२०० कोटींचा व्यापार होतो. मात्र, या बहिष्कारामुळे तुर्कीला आर्थिक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे. तर, दुसरीकडे ग्राहकांनी खिशाला थोडी झळ बसली तरी चालेल मात्र तुर्कीचे सफरचंद नकोच, असा पवित्रा घेतला आहे. तर, व्यापारीही तुर्कीच्या सफरचंदांऐवजी आता हिमाचल, उत्तराखंड, आणि काश्मीरमधील सफरचंदांना प्राधान्य देत आहेत. काश्मीरमधील शेतकऱ्यांनी कोल्ड स्टोअरेजमध्ये साठवलेली सफरचंदे उपलब्ध करून दिली आहेत.




