जातीचा चष्मा !
देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष उलटली आहे.जग तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भरारी घेत असताना भारतात मात्र जातीयता कमालीची वाढली आहे. ऑपरेशन सिंदूर भारतीयासाठी अभिमानाचा विषय आहे. त्या संघर्षाच्या चार दिवसांत कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी ज्या प्रकारे भारताची भूमिका देशासमोर आणि जगासमोर मांडली त्यामुळे त्या भारतातील प्रत्येक कुटुंबातील सदस्य झाल्या.प्रत्येक पित्याला आणि आईला आपल्या या मुलींचा अभिमान वाटला. देश म्हणून भारतातील सौहार्दाचे आणि धर्मनिरपेक्षतेच्या त्या प्रतिक ठरल्या. त्यांची घरातील छोट्या पडद्यावरील उपस्थिती भारतीयांना आपल्यातील कथित वेगळेपण विसरून भारत म्हणून १४० कोटी जणांचा विचार करायला प्रवृत्त करण्यासाठी पुरेशी ठरली.असे असूनही राजकारण्यांनी यात घाण केली आणि विष कालवण्याचाच प्रयत्न केला. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारले असा अत्यंत लाजीरवाणा आणि किळसवाणा प्रकार गेल्या काही दिवसांत घडला. याची सुरूवात मध्य प्रदेशातील विजय शहा नावाच्या महाभाग मंत्र्यापासून झाली. त्यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्या संदर्भात असे काही विधान केले की प्रत्यक्ष तोंडातून विशिष्ट शब्द न काढता त्यांना जे काही म्हणायचे होते ते सांगून गेले. शहांमुळे भारतीय जनता पार्टीची चौफेर कोंडी झाली. टीकेचा भडीमार झाला.एवढेच नाही तर मध्य प्रदेश उच्च न्यायालयानेही यात दखल घेतली. उद्याचा काही भरवसा नाही, सहा तासांच्या आत शहांच्या विरोधात एफआयआर दाखल करा असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले. त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली. देशभरात निदर्शनेही सुरू आहेत. तरीही राज्यातील सरकारकडून किमान शुक्रवारपर्यंत त्यांच्यावर कोणती कारवाई केली गेली नव्हती. शहांनी केलेला उपद्व्याप कमी होता की काय उत्तर प्रदेशात रामगोपाल यादव यांनी पोपटपंची केली. त्यांनी सोफिया कुरेशींचा केवळ उल्लेख केला.मात्र जे शहांनी कुरेशींबाबत केले, तेच यादवांनी विंग कमांडर व्योमिका सिंग आणि एअर मार्शल ए. के. भारती यांच्या संदर्भात केले. यादव हे उत्तर प्रदेशच्या राजकारणातील बडे प्रस्थ आहेत. माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या कुटुंबातील आणि खास मर्जितील आहेत. समाजवादी पक्षातील कोणी रामजीलाल सुमन किंवा कोणी अबू आझमी यांनी काहीतरी बरळणे वेगळे आणि रामगोपाल यादव यांनी बरळणे वेगळे. विजय शहांमुळे बॅकफूटवर गेलेल्या भारतीय जनता पार्टीला यादवांच्या विधानाने संजिवनीच मिळाली आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह सर्वच भाजप नेते यादव यांच्यावर तुटुन पडले.अर्थातच यादव यांनी सारवासारव केली आहे. तथापि, त्यांच्यासारख्या जाणत्या नेत्याने मुळात असे विधान करणेच सर्वथा चुकीचे. तसेच त्यांचा अनुभव आणि राजकीय शहाणपण पाहता त्यांनी सहजपणे अथवा भाबडेपणाने अथवा आवाका नसल्यामुळे काहीतरी विधान ठोकून दिले असेही मानायचे कारण नाही. हे एका सुनियोजित रणनीतीचा भाग असण्याचीच दाट शक्यता आहे. तसे जर असेल तर आता भारतीयांनी अशा राजकारण्यांपासून विशेष सावध राहणेच गरजेचे.त्याचे कारण त्यांच्या राजकीय लाभासाठी ही मंडळी कोणत्याही थराला जाऊन समाजात एकोपा राहताच कामा नये यासाठी सतत प्रयत्नशील असल्याचे दिसते. भारतीयांच्या आवडीची आणि श्रध्देची काही ठिकाणे आहेत. त्यातील एक क्रिडा क्षेत्र आणि त्यातही क्रिकेट, दुसरे मनोरंजन क्षेत्र म्हणजे चित्रपटसृष्टी आणि तिसरे भारतीय लष्कर. यातील लष्कराची विशेष आठवण विशिष्ट संघर्षाच्या वेळी जरी येत असली तरी इतर सर्वच वेळी भारतीयांना आपल्या लष्कराचा प्रचंड अभिमान आहे. कोणत्या नेत्याने त्यांची प्रशंसा करो अथवा न करो, भारतीयांचा लष्करावर विश्वास आहे, श्रध्दा आहे.क्रिकेट अथवा अन्य कोणता सामना पाहताना तेथे खेळणारा भारताचा प्रतिनिधी असतो व तसेच त्याच्याकडे पाहिले जाते, त्याच्यावर प्रेम केले जाते. तेथे त्याच्या जातीचा अथवा धर्माचा विचारही मनाला शिवत नाही. मनोरंजन क्षेत्राच्या संदर्भातही हाच नियम भारतीयांच्या अंगवळणी आहे. त्यांना आवडत्या कलाकाराची जात अथवा धर्म जाणून घेण्याची गरज भासत नाही. ज्यांच्या नावातून त्यांचा धर्मही जाहीर होतो आहे त्या कलाकारांवरही जगभरातील भारतीयांचे प्रेम आहे आणि त्यालाही चित्रपटसृष्टीच्या स्थापनेपासूनचा इतिहास आहे.अन्य दोन क्षेत्र किमान विरंगुळ्याची म्हणून एक वेळ कमी लेखता येतील. लष्कराच्या बाबतीत भारतीयांना असलेला अभिमान हा कशाशीही तुलना करता येण्यासारखा नाही. लष्करातील मंडळी देशवासियांच्या सुरक्षेसाठी २४ तास मृत्यूच्या छायेत जगत असतात. याची कल्पना असल्यामुळेच युध्दाच्या काळात किंवा शांततेच्या काळात लष्करातील प्रत्येक व्यक्तीबद्दल त्याच्या मातेबद्दल, पत्नीबद्दल आणि एकूणच त्यांच्या सगळ्याच कुटुंबाबत समाजात सर्वदा आदराचीच भावना दिसते.भारतीय लष्कराचा जो काही ज्ञात इतिहास आहे तोही पाहिला तर तेथे सगळे भारतीय म्हणूनच एकवटलेले दिसतात आणि परस्पराच्या खांद्याला खांदा लावून लढताना दिसतात. त्या जवानांची, अधिकाऱ्यांची जात शोधण्याचा किंवा धर्माबद्दल बोलण्याचा नतद्रष्टपणा कोणी करताच कामा नये. किंबहुना सर्वोच्च आदरस्थानी असलेल्या त्या भारतीयांबद्दल तर राजकीय नेत्यांनी आपली अक्कल पाजळूच नये. विजय यात्रा काढा, तिरंगा यात्रा काढा, जल्लोष करा आणखी काय हवे ते करा. सैनिकाच्या जातीत डोकावू नका आणि धर्माचे बोलू नका.कारण देश हाच त्याचा धर्म आहे. जात- धर्माच्या कुबड्यांची गरज तुम्हाला मते मिळवण्यासाठी आहे.




