देवळाली प्रवरा / पप्पू चित्ते (दि. 20 मे)
राहुरी तालुक्यातील रामपूर येथे शेतात ट्रॅक्टर रोटा मारीत असताना ट्रॅक्टर मालकाने ट्रॅक्टर चालक गणेश नालकर याची भेट घेवून माघारी निघाला असता अचानक आलेल्या पावसामुळे झाडाचा आश्रय घेतला.नालकर बंधू मोटारसायकल वरुन जात असताना त्यांना राहुल पठारे यांनी बोलावून घेत पाऊस उघडे पर्यंत थांबा असे सांगून गप्पा मारीत असताना अचानक विज पडल्याने राहुल पठारे या ट्रॅक्टर मालकाचा जागीच मृत्यू झाला. तर भारत नालकर व राहुल नालकर हे दोघे जण जखमी झाले आहे.जखमीवर प्रवरा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की,रामपूर ता.राहुरी येथिल निवृत्ती लोखंडे यांच्या चिक्कूच्या बागे पासून काही अंतरावर राहुल पठारे यांच्या मालकीचा ट्रॅक्टर गणेश नालकर हा चालक शेतात रोटा मारीत असताना चालक गणेश नालकर याची भेट घेवून माघारी परत असताना दुपारी ४ वाजता अचानक पाऊस आला.पावसा पासून बचाव करण्यासाठी झाडाचा आश्रय घेतला. पावसात नालकर बंधू चालले असताना त्यांना राहुल पठारे यांनी झाडा खाली बोलावून घेतले.भारत नालकर व राहुल नालकर आणि राहुल पठारे हे गप्पा मारीत असताना ढगात विजेचा मोठा आवाज झाला.तीच विज राहुल पठारे (वय ४१) यांच्या अंगावर पडल्याने जागीच ठार झाला.तर भारत नालकर व राहुल नालकर हे दोघे जण जखमी झाले आहे.
राहुल पठारे व अन्य दोन कामगारांना लोणी प्रवरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.राहुल पठारे याची वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता उपचारापुर्वी मयत झाल्याचे सांगितले.तर भारत नालकर व राहुल नालकर या दोघांचे पाय भाजले असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
राहुरीचे तहसिलदार नामदेव पाटील यांनी घटनेची माहिती घेवून जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती कळविली आहे. घटनास्थळी कामगार तलाठी यांनी भेट दिली.




