मुळा धरणाचा विसर्ग २५ हजार क्युसेसवर; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
राहुरी/ सार्व मंथन
राहुरी तालुक्यातील प्रमुख जलस्रोत असलेल्या मुळा धरणाच्या आवक-विसर्गामध्ये वाढ होत असून आज दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम राहिला. त्यामुळे धरणातील पाणीपातळी वाढल्याने विसर्गात ५ हजार क्युसेसने वाढ करून एकूण २५ हजार क्युसेस इतका करण्यात आला आहे.
सध्या धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू असून परिस्थितीनुसार विसर्गात कमी-जास्त बदल करण्याची कार्यवाही केली जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. मुळा नदीकाठच्या सर्व गावांमधील नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने सतर्क राहावे, अनावश्यक हालचाली टाळाव्यात, असे आवाहन तहसील प्रशासन व जलसंपदा विभागाने केले आहे.
नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वेगाने वाढत असल्याने नदीकाठावरील शेतकरी, ग्रामस्थ, तसेच जनावरे सांभाळणारे नागरिक यांनी तातडीने सुरक्षित स्थळी हलवावे, असा इशारा देखील प्रशासनाकडून देण्यात आला आहे.




