श्रीरामपूर / सार्वमंथन(विशाल साळुंके)
श्रीरामपूरच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप घडण्याची चिन्हं स्पष्ट दिसू लागली आहेत.
भाजपचे वरिष्ठ आणि प्रभावशाली नेते प्रकाश चित्ते यांनी पक्षाला रामराम ठोकत आज शिवसेना (एकनाथ शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला आहे.
मुंबई येथे मुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा भव्य पक्षप्रवेश सोहळा आज दुपारी होणार असल्याची पुष्टी सूत्रांकडून मिळाली आहे. श्रीरामपूर तालुक्यात प्रकाश चित्ते यांचा मोठा जनाधार असून, त्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची निर्मिती होण्याची दाट शक्यता आहे.
यावेळी तालुका संपर्कप्रमुख जनार्दन लाल पगार, सुनिल मुथा, संजय पांडे, राजेंद्र कांबळे, माजी नगरसेवक किरण लुनिया आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. चित्ते यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.
यापूर्वीच माजी आमदार भानुदास मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे आणि सागर बेग यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. आता प्रकाश चित्ते यांच्या प्रवेशामुळे शिवसेना (शिंदे गट) ची ताकद आणखी मजबूत होणार आहे.
विशेष म्हणजे, या नव्या प्रवेशामुळे आगामी विधानपरिषद निवडणुकीत चार उमेदवारांमधील मतविभागणी वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे काँग्रेसला थेट फायदा होणार नाही, असे राजकीय सूत्रांचे मत आहे.
श्रीरामपूर आणि परिसरात गेल्या काही महिन्यांपासून शिंदे गटात सातत्याने होत असलेल्या पक्षप्रवेशांमुळे या गटाचा जनाधार झपाट्याने वाढताना दिसतो आहे.
भानुदास मुरकुटे, सागर बेग, भाऊसाहेब कांबळे आणि आता प्रकाश चित्ते यांच्या रूपाने शिंदे गटाने श्रीरामपूरच्या राजकारणात आपले अस्तित्व ठळकपणे अधोरेखित केले आहे.
आतापर्यंत विधानसभा निवडणुकीत दोन नंबरवर असलेला शिवसेना (शिंदे गट) पक्ष आता पहिल्या क्रमांकावर झेपावल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
राजकीय वर्तुळात यामुळे नवा कलाटणीबिंदू निर्माण झाला असून, श्रीरामपूरमधील आगामी निवडणुका अत्यंत रंगतदार होण्याची चिन्हं स्पष्ट आहेत.




