देवळालीत प्रशात मुसमाडेंना तिघांकडुन काठीने बेदाम मारहाण..;
मारहाणीत मुसमाडे गंभीर जखमी,तिघावर गुन्हा दाखल
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे ऊस तोडण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका शेतकऱ्याला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रशांत रमेश मुसमाडे (वय ३३, व्यवसाय शेती, रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी) यांनी फिर्याद दिली आहे. ५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या घरासमोर उभे असताना ही घटना घडली.
फिर्यादीने आरोपींना “तुम्ही माझा काल आणि आज ऊस का तोडला?” असा जाब विचारला असता आरोपी संतप्त झाले. यानंतर त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी प्रमोद गुलाब कोबरणे याने लाकडी काठीने फिर्यादीच्या पाठीवर तसेच उजव्या हाताच्या अंगठ्यावर प्रहार केला. तसेच फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी बाळासाहेब मुसमाडे, बाळासाहेब आप्पासाहेब मुसमाडे आणि प्रमोद गुलाब कोबरणे (सर्व रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नवले करीत आहेत.






