नेवासा तालुक्यातील माका येथील घटना .
शनिशिंगणापूर /दि.१७ मे (गणेश बेलेकर)
नेवासा तालुक्यातील माका येथे एका नवविवाहित तरुतीचा गळा आवळून खुन झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की पुजा अशोक गोरे( वय वर्ष २२) हिचा विवाह चार वर्षापुर्वी माका येथील अशोक अर्जुन गोरे याच्याशी झाला होता. नव्या नवरीचे नऊ दिवस या प्रमाणे काही दिवस सासरच्या मंडळींनी तिस सुखाने नांदवले .परंतु तु तुझ्या वडिलांकडून दोन लाख रुपये घेऊन ये असे म्हणत तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा शारीरिक व मानसिक छळ तिचे सासरची मंडळी करु लागले. अशातच त्यांच्या संसारवेली वर एक गोंडस मुलगा रुद्रा चा जन्म झाला. ती त्या मुलाकडे बघत एक एक दिवस काढत होती. पुन्हा एकदा तिला दिवस गेले, परंतु तिचा सुरू असलेला छळ काही केल्या थांबत नव्हता. दि. १५ मे रोजी सकाळी ११ ते दि. १६ रोजी सकाळी १०.१५ वाजेच्या सुमारास फिर्यादी यांची मुलगी घरातून निघून गेल्याने तिच्या वर रागाच्या भरात लैगिक अत्याचार करत तिचा गळा आवळून जिवे ठार मारले तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी माका शिवारात पाटाच्या पाण्यात फेकून दिले असल्याचे फिर्यादी मुलीचे वडील गणेश मच्छिंद्र ऐडके रा. मुथलवाडी ता, पैठण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. दि. १७ रोजी सोनई पोलीस ठाण्यात आरोपी अशोक अर्जुन गोरे, पांडुरंग अर्जुन गोरे रा. माका यांचे विरुद्ध गुन्हा र. नं. १९३/२०२५ बिएनएस चे कलम १०३(१), २३८,८४,११५(१), ३५२,३५१(१), (२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती समजताच शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी ,पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे तसेच पोलीस उपनिरीक्षक काकासाहेब राख यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहाणी करत आरोपींना तातडीने ताब्यात घेतले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी हे करत आहेत.
मात्र एका नविवाहित तरुणीची निर्घृणपणे हत्या केल्याने परिसरामध्ये मोठा संताप व्यक्त होत आहे.




