देसवंडीचा ३७ वर्षीय शेतकरी अचानक बेपत्ता; अपहरणाचा संशय, राहुरी पोलिसांत गुन्हा
रात्री झोपला अन् सकाळी गायब! घराच्या रस्त्याच्या वादाला संशयाची किनार; निवृत्ती शिरसाठ यांचा पोलिसांकडून कसून शोध
राहुरी : दिव्य सार्वमंथन
राहुरी तालुक्यातील देसवंडी येथे ३७ वर्षीय शेतकरी निवृत्ती गोरक्षनाथ शिरसाठ हे घरातून कोणास काहीही न सांगता अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. निवृत्ती यांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवून नेले असावे, असा संशय त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला असून, या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुक्ताबाई गोरक्षनाथ शिरसाठ (वय ६८) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, शिरसाठ कुटुंब देसवंडी येथे शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह करते. कुटुंबाच्या शेजारी त्यांचे पुतणे अशोक दशरथ शिरसाठ, सतीश दशरथ शिरसाठ व गीताराम दशरथ शिरसाठ राहतात. घराच्या रस्त्यावरून दोन्ही कुटुंबांमध्ये पूर्वीपासून वाद असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दि. ५ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १० वाजता कुटुंबातील सर्वांनी जेवण करून झोप घेतली. त्यावेळी निवृत्ती हे शेजारील खोलीत झोपण्यासाठी गेले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी ६ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ६ वाजता मुक्ताबाई घराची साफसफाई करण्यासाठी गेल्या असता निवृत्ती घरात दिसून आले नाहीत.
निवृत्ती यांचा शोध घेण्यासाठी मुक्ताबाई व त्यांचा नातू साई राजेंद्र आढाव यांनी परिसर, आजूबाजूची ठिकाणे तसेच नातेवाईकांकडे चौकशी केली. मात्र, बराच शोध घेऊनही निवृत्ती यांचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली.
निवृत्ती हे कोणास काहीही न सांगता घरातून निघून गेले असावेत, अशी सुरुवातीला शक्यता होती. मात्र, परिस्थिती संशयास्पद वाटल्याने त्यांना कोणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेले असावे, असा संशय फिर्यादीत व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे निवृत्ती यांचा तातडीने शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे परत आणावे, अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे.
या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ११४४/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, बेपत्ता निवृत्ती शिरसाठ यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. घराच्या रस्त्याच्या जुन्या वादाला या बेपत्ता प्रकरणामुळे संशयाची किनार मिळाल्याने पोलिसांच्या तपासाकडे आता देसवंडीकरांचे लक्ष लागले आहे.






