अहिल्यानगर/ सार्व मंथन /प्रतिनिधी
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले असून, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज सोमवारी दमदार शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार काशिनाथ दाते, आमदार अमोल खताळ यांची प्रमुख उपस्थिती होती. या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमुळे तनपुरेंच्या उमेदवारीला राजकीय वजन प्राप्त झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
अर्ज दाखल करण्याच्या वेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. घोषणाबाजी, जल्लोष आणि समर्थकांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसरात निवडणुकीचे वातावरण रंगले होते. तनपुरेंनी केलेल्या या शक्तिप्रदर्शनामुळे आगामी निवडणुकीत त्यांची ताकद स्पष्टपणे दिसून आली आहे.
दरम्यान, या अर्ज दाखल सोहळ्याकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, पुढील लढतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले
आहे.





